ग्लोबलायझेशन आणि इंटरनेटमूळे सगळं जग जवळ आलं आहे. आपल्यासारखी बरीच लोकं या जगाच्या पाठीवर आहेत, ही जाणीव लोकांना होत आहे. सुखाची आणि दुःखाची मुळं प्रत्येकासाठी वेगळी असली तरीही ते अनुभवणारं मन एकंच आहे. हे मन सतत स्वतःची तुलना इतरांसोबत करत राहतं. इतरांनी दिलेल्या त्रासाचा विचार करत बसतं आणि वेदनेचं पांघरून घेऊन जगापासून दूर जायला लागतं; एकटं पडत जातं. अशा एकट्या, दुःखी, निराश मनांवरचं वेदनेचं पांघरून काढून त्यांना उबदार सूर्यप्रकाशात आणण्याचं काम 'मुक्त झाले मानवी अश्रू' करतं. सेल्फ लव, स्वतःवर प्रेम करा ही संकल्पना आजच्या तरुणाईच्या गप्पांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पण स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं असतं ? स्वतःच्या आयुष्यात सगळ्यात आधी स्वतःला प्राधान्य द्यायचं की स्वतःच्या अंतरंगात डोकावून स्वतःचा आहे तसा स्वीकार करायचा आणि त्यावर बाह्य घटकांचा परिणाम होऊ द्यायचा नाही, याचं उत्तर हे पुस्तक वाचताना नक्की मिळेल. LGBT, सिंगल पॅरेन्ट्स, विधवा आणि इतर अनेक लोकांच्या वेदना या कथासंग्रहात आहेत. त्या वेदनांना मुक्त करताना, गवसलेल्या वाटेला तत्वज्ञानाची जोड देत, राहुलने या कथा अत्यंत सहज सोप्या भाषेत आणि खूप संवेदनशीलपणे मांडल्या आहेत.